नागपूर

बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर महाराष्ट्रात अव्वल

आतापर्यंत ४३३१२१ नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्र

नागपूर दिनांक 19 ऑगस्ट ( प्रतिनिधी )

कोरोनाच्या संकटात लसीकरण हे मोठे संरक्षण ठरले. लसीकरणामुळे कोरोनाची लाट थोपवून लावता आली. मात्र पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनातर्फे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले व त्यासाठी विशेष मोहिम सुद्धा राबविण्यात आली.

शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर महानगरपालिकेद्वारे बुस्टर डोस साठी अभियान राबविले. त्याचेच फलीत मिळत असून आज संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. शुक्रवार १९ ऑगस्टपर्यंत नागपूर शहरातील ४३३१२१ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

केंद्र शासनाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १५ ऑगस्टपर्यंत बुस्टर डोससाठी विशेष मोहिम राबविली. नागपूर महानगरपालिकेद्वारे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात आली.

मनपाद्वारे १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणामध्ये ‘हर घर दस्तक’ मोहिम सुद्धा राबविण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात आले. याशिवाय शहरात लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ दिवस चाललेल्या विशेष लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या १५ दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिली. १५ दिवसात १ लाखावर नागपूरकरांनी बुस्टर डोस घेतला. पुढे या मोहिमेला नागरिकांनी अधिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला.

नागपूर जिल्हयाची लोकसंख्या ५०९५४०५ आहे. यापैकी सर्व वयोगटातील ३०८६२८५ नागरिक बुस्टर डोससाठी पात्र ठरले आहेत. या पात्र व्यक्तींपैकी १९ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार ४३३१२१ पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण १४.३ टक्के एवढे आहे.

विशेष म्हणजे, नागपूर शहराचा विचार करता 17,72,049 पात्र व्यक्तींपैकी 3,11,689 नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. हे प्रमाण 17.58 टक्के एवढे आहे. नागपूर जिल्हयाने बुस्टर डोसमध्ये राज्याची राजधानी मुंबईला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईचे बुस्टर डोसचे प्रमाण १३.५७ टक्के एवढे आहे. तर पालघर (१२.४ टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी नागपूरकर घेत असलेला पुढाकार हा स्तूत्य आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मनपाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मनपाच्या आवाहनाला नागरिक सुद्धा उत्तमरित्या प्रतिसाद दर्शवित असून लसीकरण घेणा-यांची संख्या वाढते आहे.

बुस्टर डोस बाबतही नागरिकांचा पुढाकार ही समाधानकारक बाब असली तरी पात्र सर्व व्यक्तींचे तिनही डोसचे लसीकरण होणे आवाश्यक आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अद्यापही लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

आता कोर्बेव्हॅक्सचे सुद्धा बुस्टर डोस

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर आता कोर्बेव्हॅक्स लसीचे सुद्धा बुस्टर डोस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड यापैकी कुठल्या एका लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या १८ वर्षावरील नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचे बुस्टर डोस घेता येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाद्वारे पत्र जारी करण्यात आले आहे.

आतापर्यंत १२ ते १५ या वयोगटातील मुलांनाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जात होते. राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांनी पहिला व दुसरा डोस ज्या प्रकारचा घेतला आहे त्याच प्रकारचा प्रिकॉशन डोस घेता येत होता.

उदा – ज्या नागरिकांनी पहिले दोन डोस कोव्हॅक्सिन लस घेतली आहे त्यांना प्रिकॉशन (बुस्टर) डोस हा कोव्हॅक्सिन लसीचा दिला जायचा. तसेच ज्या नागरीकांनी पहिले दोन डोस कोव्हिशिल्ड लस घेतली आहे त्यांना प्रिकॉशन डोस हा कोव्हिशिल्ड लसीचा दिला जायचा. आता १८ वर्षावरील नागरिकांनी पूर्वी पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड लसीचे घेतले असतील अशा नागरीकांना कोर्बेव्हॅक्स लस प्रिकॉशन (बुस्टर) डोस म्हणून घेता येणार आहे.

सदर लसीची प्रिकॉशन (बुस्टर) डोससाठी नोंद कोविन प्रणालीवर करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुस्ती कोविन पोर्टलवर करण्यात आलेली आहे, असेही प्राप्त पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन किंवा कोर्बेव्हॅक्स या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवडयाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!