पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यात मंगळवारी जंतनाशक गोळ्यांचेे घरोघरी जावून वितरण

१ ते १९ वर्षे वयोगटातील ३ लाख ३९ हजार मुलांना लाभ

• आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जावून वितरण

वाशिम, दि. २० : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २१ सप्टेंबर २०२१ रोजी जंतनाशक गोळ्यांचे सर्व शाळांमध्ये, तसेच घरोघरी जावून वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज, २० सप्टेंबर रोजी झाली. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळ्यांचे दिली जात आहे. या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुला-मुलींसाठी शासकीय, अनुदानित, विना अनुदानित सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थास्तरावर, तसेच शाळेत न जाणाऱ्या बालकांना, किशोरवयीन मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याद्वारे २१ सप्टेंबर २०२१ रोजी जंतनाशक गोळी घरपोच देण्यात येणार आहे. १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पावडर करून देण्यात येईल, तसेच २ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक गोळी चावून खाण्यासाठी देण्यात येणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, असे डॉ. आहेर यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील सुमारे ३ लक्ष ३९ हजार ३८३ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गोळ्यांचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन झाल्यानंतर यादिवशी ज्यांना गोळ्यांचे वाटप झालेले नाही, अशा मुलांना २८ सप्टेंबर रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!