
नागपूरात बाप्पाचा विसर्जनासाठी २४८ कृत्रिम कुंडाची व्यवस्था
नागपूर, ता. १७ : नागपूरात श्री गणेश विसर्जन १९ सप्टेंबर ला मोठया प्रमाणात होणार आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे व्यापक तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी प्रत्येक झोन मध्ये लोखंडी सेंट्रिंग/ सीमेंटचे कृत्रिम तलाव, खड्डे करुन कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व झोन मिळून २४८ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक झोनमध्ये विसर्जन रथ सुध्दा धावणार आहे.
तसेच नागपूर शहरातील कुठल्याही तलावात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता येणार नाही. मनपा प्रशासनाने एका आदेशाद्वारे विसर्जनाला बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व तलावांना टिनांचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी सर्वच तलावांवर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कामांची पाहणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (१७ सप्टेंबर) रोजी केली. त्यांच्या सोबत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर उपस्थित होते.
शहरातील सोनेगाव तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव, गांधीसागर आणि फुटाळा तलावालामध्ये टिनाचे कठडे लावण्यात आले आहे. महापौरांनी गांधीसागर तलाव, फुटाला तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगांव तलावाला भेट दिली. पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी व संबंधित झोनचे झोनल आरोग्य अधिकारी रामभाऊ तिडके, धर्मेन्द्र पाटिल, दीनदयाल टेंभेकर उपस्थित होते.
गणेशमूर्ती तलावात विसर्जनाला बंदी घालण्यामागे कारण म्हणजे जलप्रदूषण रोखणे हा उद्देश आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यात सहकार्य करावे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंडाचाच वापर करावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
या शहराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. यामध्ये जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. घरगुती गणपतीचे शक्यतो घरीच विसर्जन करावे अथवा नजिकच्या छोट्या कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करावे. सार्वजनिक गणेश मंडळांनी तलावाशेजारी तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात विसर्जन करावे. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे, अशी सूचना त्यांनी केली.