
डेंग्यू, विषमज्वर, मलेरियासोबतच घ्या मिसाची काळजी
नागपूर, ता. १७ : मागील अनेक महिन्यांपासून कोव्हिडच्या संसर्गाचा सामना आपण सर्व करीत आहोत. सध्या कोव्हिडचा संसर्ग कमी असला तरी धोका कायम आहे. मात्र यासोबतच पावसाळ्यात उद्भवणा-या विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, विषमज्वराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा कोव्हिड नंतर उद्भवणा-या मिसा (मल्टी सिस्टीम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम) या आजाराचाही धोका वाढला आहे. प्रतिकारशक्ती उत्तम असणा-यांमध्येच या आजाराचे प्रमाण दिसून येत असल्याने आता डेंग्यू, विषमज्वर अर्थात टायफाइड, मलेरिया या आजारांसोबतच मिसाची सुद्धा काळजी घ्यावी, असे आवाहन वेलकेअर सर्जिकल हॉस्पीटलचे संचालक डॉ. विपीन उपाध्याय यांनी केले.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू, टायफाईड, मिसा आजार आणि त्यावरील उपचारासंदर्भात डॉ. विपीन उपाध्याय यांनी शुक्रवारी (ता.१७) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
म्यूकरमायकोसिस प्रमाणेच मिसा हा आजार सुद्धा कोव्हिडनंतर उद्भवतो. मात्र म्यूकरमायकोसिसमध्ये प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णाला जास्त धोका असतो. मिसामध्ये याचा विपरीत दिसून येते. कोव्हिड होउन गेलेले किंवा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले पण चाचणी न केल्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत हे न कळलेल्या व्यक्तींना याचा धोका असतो. लहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असते त्यामुळे त्यांनाही याचा धोका अधिक दिसून येतो. मिसाची लक्षणे ही डेंग्यू, विषमज्वर, मलेरियाप्रमाणेच दिसून येतात. त्यामुळे अनेकदा मिसाच्या रुग्णांना डेंग्यूचेच उपचार होत असल्याचे दिसून येते. मिसा या आजाराचे उपचार अत्यंत साधे व स्वस्त आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. थंडी लागून ताप येणे, हातपाय, डोके दुखी असल्यास डेंग्यू, विषमज्वर प्रमाणेच मिसाची सुद्धा चाचणी करण्यात यावी. चाचणीमध्ये मिसा पॉझिटिव्ह दिसून आल्यास व वेळीस उपचार घेतल्यास तो त्वरीत बरा होउ शकतो. त्यामुळे सतर्क रहा आणि त्वरीत उपचार घ्या, असेही आवाहन डॉ. विपीन उपाध्याय यांनी केले.