
जिल्हा परिषदेच्या सभागृहात लसीकरण मोहीम,61 अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली लस
नागपूर दि. 17 : जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार आता शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान होणार आहे .त्याचा पहीला टप्पा म्हणून आज जिल्हा परिषदेतील आबासाहेब खेडकर सभागृहात लसीकरणाला सुरुवात झाली.
लसीकरणाबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह होता. ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेत नाही किंवा ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित होता त्या सर्वांनी या लसीकरण मोहीमेतून डोस घेतले. आज 37 कर्मचाऱ्यांनी पहिला तर 24 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.
जिल्ह्यातील लसीकरणाला गतिमान करण्यासाठी व लोकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी सध्या प्रशासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण शासकीय कार्यालयात उपलब्ध असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यालय परिसरातच लसीकरणाची सोय उपलब्ध असल्याने वेळ वाचल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यातही अन्य शासकीय कार्यालयांमध्ये लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे.सध्या सणासुदीच्या कार्यकाळात नागरिकांनी कोविड प्रोटोकॉल चे पालन करावे. नागरिकांनी शारीरिक अंतर, सतत हात धुवायचे आणि तोंडावर मास्क् घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.