नागपूर

सणासुदीच्या दिवसामध्ये मिठाई खरेदी करतांना दक्ष राहा: अन्न व औषध प्रशासन विभाग

नागपूर दि. 16 : सणासुदीच्या काळात अनेक मिठाई, पेढे, खवा व नमकीन पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला उपलब्‍ध आहेत. मात्र सणासुदीत मिठाई घेताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते. किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. तसेच खाद्यतेल, साजूक तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घेण्याची सूचना विभागाने केली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट) यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. तसेच दूध, खवा, खाद्यतेल, वनस्पती तूप, साजूक तूप हे पदार्थ परवानाधारक, नोंदणीकृत व्यावसायकिांकडून खरेदी करावेत, त्यांची बिलेही सांभाळून ठेवावीत, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करु नये. खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आतच करावे. तसेच ते साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे. मिठाईची चव किंवा गंधात फरक जाणवल्यास ती नष्ट करावी. इत्यादी प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन जयंत वाणे यांनी केले आहे.

प्रशासनातर्फे मिठाई विक्रेत्यांसाठीही काही अनिवार्य सूचना देण्यात आल्या आहेत. मिठाई तयार करताना खाद्यरंगाचा मर्यादेतच वापर करावा. दुकानातील परिसर स्वच्छ ठेवावा. दुग्धजन्य मिठाई ही आठ ते दहा तासांच्या आतच खाण्याबाबत ग्राहकांना निर्देश द्यावेत. माशा बसू नये म्हणून अन्नपदार्थावर जाळीदार झाकण टाकावे. स्वतःचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. अन्नपदार्थ तयार करताना एका तेलाचा वापर फार तर दोन किंवा तीन वेळाच करावा. त्यानंतर ते तेल बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे.या दूरध्वनींचा करा वापर

अन्नपदार्थ व मिठाई विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील तरतुदींचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अन्नपदार्थात भेसळ किंवा फसवणूक केल्याचे आढळल्यास ग्राहकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 0712 -2555120 या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, जयंत वाणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!