पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

• सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणार सुनावणी

• दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश

वाशिम, दि. १५  : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार शनिवार, २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा शं. सावंत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकबद्दलची (आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून इतर) प्रकरणे, आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भू-संपादन प्रकरणे तसेच मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी दिवाणी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

ज्या पक्षकारांची वरील संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी आपली प्रकरणे आपसांत करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!