
नागरिकांनी कोरोना संपलेला नाही असे समजून कोविड नियमाचे पालन करावे -जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
वर्धा, दि. 14 : सध्या जिल्हयात गणपती उत्सव त्याचबरोबर पुढील काही दिवसात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सण उत्सव साजरा करतांना साध्या पणाने साजरा करावा. कारण कोरोना संपलेला नसून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी बाजारात गर्दी करुन नये त्याचबरोबर कोरोना नियमाच्या त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज नागरिकांना केले.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांची उपस्थिती होती.
वर्धा जिल्हयाच्या लगतच्या जिल्हयात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहे. अशा परिस्थिती जिल्हयात मोठया प्रमाणात धार्मिक सण उत्सव साजरे करण्यात येतात परंतु उत्सव साजरे करतांना कोरोना नियमाचे पालन करुन मागील वर्षी ज्याप्रमाणे साधेपणाने सण उत्सव साजरा केला त्याप्रमाणे याहीवर्षी साजरा करावा मात्र बाजारात गर्दी करु नये. यामुळे लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि लोंकाची रोजी रोटी बंद होणार नाही. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रशासन सज्ज
कोविडची तिसरी लाट आल्यास प्रशासनाच्या वतीने पर्याप्त प्रमाणात ऑक्सीजन बेड तयार करण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने सामान्य रुग्णालयात 450 व 1 हजार मेट्रीक टन साठा असलेले ऑक्सीजन प्रकल्पासोबतच आर्वी, कारंजा व हिंगणघाट येथे ऑक्सीजन प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर संभाव्य तिस-या लाटेत बालकांवर होणा-या परिणाम लक्षात घेता सामान्य रुगणालय येथे ऑक्सीजन व्हेंटीलेटरसह बाल कोविड वार्ड तयार करण्यात आला आहे.
मागील काळात लसीकरण पुरवठा कमी प्रमाणात झालेला होता परंतु आता पर्याप्त प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे व जिल्हयातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, लसीकरणाचे उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर पथक तयार करण्यात आले असून पथकामार्फत नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच सध्या पावसाळा सुरु असल्याने डासाच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने जिल्हयात डेंगू आजाराच्या रुग्णात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत पथकामार्फत जनजागृती करण्यात येत असल्याचे सचिन ओम्बासे यांनी सांगितले