
यशोधरानगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हत्येची घटना
रविवारी रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालयाच्या समोर हे हत्याकांड घडलं. आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांनी मारेकऱ्यांबाबत माहिती काढली असून पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सलग दोन दिवस हत्येच्या घटना
धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवारी रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.