
शहरातील तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी; तलावांना टिनाचे कठडे
नागपूर, ता. ११ : यावर्षी नागपूर शहरातील कुठल्याही तलावात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता येणार नाही. मनपा प्रशासनाने एका आदेशाद्वारे विसर्जनाला बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व तलावांना टिनांचे कठडे लावण्यात येत असून मूर्ती विसर्जनासाठी सर्वच तलावांवर पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. या सर्व कामांची पाहणी शनिवारी (ता. ११) स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर आणि आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांनी केली.
दोघांनीही शहरातील सोनेगाव तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव, गांधीसागर आणि फुटाळा तलावाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, नाईक तलाव येथील पाहणीत माजी उपमहापौर तथा नगरसेवक दीपराज पार्डीकर तर धरमपेठ येथे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी व संबंधित झोनचे झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जलप्रदूषण टाळण्यासाठी यंदा शहरातील कुठल्याही तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार नाही, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. या निर्देशानुसार, तलावात कुणीही मूर्ती विसर्जन करू नये, यासाठी तलावांना टिनाचे कठडे लावून बंद करण्यात येत आहे. शिवाय गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सेंट्रिंग ठोकूण मोठे विसर्जन कुंड तसेच जमीन खोदून विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे. सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, फुटाळा या तलावांना कठडे लावण्याचे कार्य जवळपास पूर्ण झाले असून नाईक तलाव येथील कार्य प्रगतीपथावर आहे.
गणेशमूर्ती तलावात विसर्जनाला बंदी घालण्यामागे कारण म्हणजे जलप्रदूषण रोखणे हा उद्देश आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यात सहकार्य करावे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंडाचाच वापर करावा, असे आवाहन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी यावेळी केले.
या शहराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. यामध्ये जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. घरगुती गणपतीचे शक्यतो घरीच विसर्जन करावे अथवा नजिकच्या छोट्या कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करावे. सार्वजनिक गणेश मंडळांनी तलावाशेजारी तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात विसर्जन करावे. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे, असे आवाहन आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांनी केले.
दहा झोनमध्ये २४८ कृत्रिम विसर्जन कुंड
नागरिकांच्या सोयीसाठी यंदा दहाही झोनमध्ये २४८ कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक झोनमध्ये तीन अतिरिक्त फायबर कृत्रिम टँक असे दहा झोन मिळून ३० टँक अत्यावश्यक वापरासाठी प्रस्तावित आहेत. सन २०१९ मध्ये एकूण २७६ तर सन २०२० मध्ळे १८४ कृत्रिम कुंड ठेवण्यात आले होते. प्रत्येक झोनमध्ये दोन मोबाईल कृत्रिम विसर्जन कुंड राहतील. नागरिकांच्या मागणीप्रमाणे ते घरासमोर येईल. त्यातही गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. कचरा संकलन करणाऱ्या स्वतंत्र गाड्या निर्माल्य संकलनासाठी उपलब्ध राहतील. यात जमा झालेले निर्माल्य कंपोस्टिंगसाठी नजिकच्या उद्यानात अथवा भांडेवाडी येथे पाठविण्यात येईल.