
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
• शेतपिकांचे नुकसान, गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा
वाशिम, दि. 10 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज, ९ सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मापारी, जलसंधारण विभागाचे साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा होवून पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना पंचनामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना द्याव्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रत्येक नुकसानीचा समावेश पंचनाम्यामध्ये होणे आवश्यक आहे. तसेच घरांची पडझड, पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
अतिवृष्टीमुळे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्याने ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचे नुकसान झाले असल्यास जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्वरित तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीचा अडथळा दूर करावा. पाणी पुरवठा योजना नादुरुस्त होवून पाणी पुरवठा खंडित झाला असल्यास सदर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे कारंजा तालुक्यात सुमारे ८९४ हेक्टर व मानोरा तालुक्यातील १० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याविषयीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात कोविड-१९ नियमांचे पालन आवश्यक- पालकमंत्री देसाई
कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे. गणेशोत्सव कालावधीत कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याविषयी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना द्याव्यात. श्रीगणेश आगमन व विसर्जन कालावधीत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केल्या.
पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज असून कोविड-१९ नियमावलीचे पालन करण्याबाबत सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचित करण्यात आले आहे. तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाया व उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.