
अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह पोलिसांनी थांबवला आणि जे सत्य समोर आले ते पाहून पोलिसही हादरले
अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह पोलिसांनी थांबवला आणि तपासणीनंतर जे सत्य समोर आले ते पाहून पोलिसही हादरले
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने लोखंडी विळ्याने वार करून तिचा खून केला. खुनाचा प्रकार दडविण्यासाठी मुलाने आकस्मिक मृत्यूचा देखावा करून तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारासाठी नेत असताना वाटेतच पोलिसांनी मृतदेह रोखला. नंतर आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली. ही घटना तुमसर पोलिस ठाण्यांतर्गत सालई बु. येथे मंगळवारी घडली.
सरस्वता नारायण तुमसरे (७४) रा. सालई बुज. असे मृत आईचे नाव आहे. तर गौरीशंकर नारायण तुमसरे (३४), असे आरोपी मुलाचे नाव आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी सरस्वता या स्वयंपाक खोलीत पडून मरण पावल्याची माहिती मुलगा गौरीशंकरने गावात दिली. त्यानंतर विधिवत अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली. सकाळच्या सुमारास आई आणि मुलामध्ये भांडण झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. त्यातूनच संशय निर्माण झाला. त्यातील एकाने पोलिसांना कळविले. इकडे, अंत्यसंस्कारासाठी सर्व पाहुणे आले होते. अंत्ययात्राही निघाली. पोलिसांनी वेळीच धाव घेत रस्त्यातच सरस्वता यांची अंत्ययात्रा रोखली. गौरीशंकरला मृत्यूचे कारण विचारले. त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी सरस्वता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला. गौरीशंकरला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्याने आईच्या खुनाची कबुली दिली.
दारूसाठी पैसे न दिल्याने विळ्याने वार
पोळ्याचा पाडवा असल्याने गौरीशंकर हा सकाळी दारू पिऊन घरी आला. त्याने आईला दारू पिण्यासाठी आणखी पैसे मागितले. आईने नकार दिल्याने संतापलेल्या गौरीशंकरने आईवर लोखंडी विळ्याने वार केला. यात तिचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याच्या भीतीने तिचा मृत्यू खाली पडून झाल्याचे गावकऱ्यांना सांगू लागला. परंतु, पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न उधळून लावला. तुमसर पोलिसांनी गौरीशंकरविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आाहे.