
केंद्र शासनाच्या स्क्रॅप पॉलिसीची सक्तीने अंमलबजावणी करा : आयुक्त
नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत ‘आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस स्वच्छ निळ्या आकाशासाठी’ मनपामध्ये आयुक्त सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘हेल्थी एअर, हेल्थी प्लॅनेट’ ही यावर्षीची थीम आहे. नागपूर शहरात वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्क्रॅप पॉलिसीची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, केंद्र शासनाने स्क्रॅप पॉलिसी घोषित केली आहे. त्याअनुषंगाने १५ वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या वाहनांना भंगारमध्ये टाकणे आवश्यक आहे. आयुक्तांनी सांगितले की, वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने नवीन निती तयार केली आहे. याचा वापर केल्यास जुन्या वाहनांवर बंदी घालू शकतो, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अशा वाहनाविरुद्ध मोठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी जुन्या वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र तपासण्याचे सुद्धा निर्देश दिले. तसेच नागरिकांना, वाहनचालकांना सुद्धा याची माहितीसाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा बॅनरचे लोकार्पण करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी सांगितले की, नागपुरात १५ लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहन आहे आणि दोन लाखांपेक्षा जास्त चारचाकी वाहन आहेत. आरटीओतर्फे वाहनांची प्रदूषण तपासणी नियमित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी सक्तीने केली जाईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक कारे यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या वेळी नागपूरचे प्रदूषण कमी झाले होते. त्या वेळी रस्त्यावर वाहन कमी होते त्यामुळे आर. एस. पी. एम. चे प्रमाण हवेतून कमी झाले. यातून हे सिद्ध होते की वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात वाहन प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, बायोमास, कचरा जाळणे, आणि धूळ प्रदूषण यावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमात उपायुक्त विजय देशमुख, रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, टेरीचे संचालक सुनील पांडे, व्हीएनआयटी चे डॉ. दिलीप लटाये, पर्यावरण विभागाचे भीमराव राऊत, संदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या लिना बुधे आणि अन्य उपस्थित होते.