नागपूर

प्रदूषण करणा-या वाहनांवर कारवाई करा : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी

परिवहन अधिका-यांना निर्देश : वायुप्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यासंदर्भात बैठक

 नागपूर, ता.२ : वायुप्रदूषण नियंत्रण कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना शहरातील धूर सोडणारे व प्रदूषण करणा-या वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे. वाहनांमधून होणा-या प्रदूषणावर नियंत्रण गरजेचे असून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) सर्व वाहनांना असणे अनिवार्य आहे. यादृष्टीने परिवहन विभागामार्फत वायू प्रदूषण करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात यावी. याशिवाय १५ वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या वाहनांवरही ‘स्क्रॅब पॉलिसी’अंतर्गत आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर परिवहन विभागाला दिले.

नागपूर शहराच्या वायुप्रदूषण नियंत्रणाकरिता मंजुर वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहराचे सुक्ष्म नियोजन कार्य आराखडा तयार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आला आहे. नागपूर शहराच्या वायुप्रदूषण नियंत्रणाकरिता स्थापित नागरीस्तरीय कृती समितीची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत गुरूवारी (ता.२) बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, व्हीएनआयटी, नीरी या विभाग व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत उपायुक्त रवींद्र भेलावे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोनाली चव्हाण, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अजयकुमार मालवीया, नागपूर शहर परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नायब तहसीलदार स्नेहल ढोके, व्हीएनआयटीचे डॉ. दिलीप लटाये, नीरीच्या पदमा राव, संगीता गोयल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अशोक कारे, ए.एन.कापोले, के.पी.पुसदकर, एम.डी.भिवापुरकर, मनपाचे वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, वाडी नगरपरिषदेच्या सुषमा भालेकर, पिंकेश चकोले, मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, मनपाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे आदींची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये शहराच्या सुक्ष्म नियोजन कृती आराखड्याबाबत नीरी द्वारे सादरीकरण करण्यात आले. सुक्ष्म आराखड्यांतर्गत वायुप्रदूषण नियंत्रणासाठी समाविष्ट बाबींची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागांना निर्देश दिले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मंजुर प्रकल्पांच्या सद्यस्थितीचाही यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. शहरातील वायुप्रदूषण नियंत्रणाकरिता सदर प्रकल्पाची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत नागपूर शहराची वायु गुणवत्ता सुधारण्याकरिता निश्चित केलेल्या प्रस्तावित प्रकल्पांच्या प्रस्तावाच्या मंजुरीची कार्यवाही तातडीने करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

वायुप्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यांतर्गत संबंधित विभागांनी अल्प व मध्यम अवधीचे (शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म) नियोजन करण्याबाबतही आयुक्तांनी संबंधित विभागांना सुचित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!