पूर्व विदर्भ

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा : जिल्हाधिकारी देशभ्रतार यांचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पुर्वपरवानगी आवश्यक

 श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुतीसाठी 2 फुट उंच मर्यादा

 गर्दी टाळण्यासाठी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्कद्वारे करावी.

 श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यास मनाई

 कोविड नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील

 आरोग्य विषयक उपक्रम आयोजिनास प्राधान्य द्यावे 

 स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

वर्धा दि. 02 सप्टेंबर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले असून यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शक सूचना निर्गिमित केल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालीका/नगर पंचायत/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नगरपालीका/नगरपंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादीत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपुरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

गणेशोत्सव कालावधीत ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लागू निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजीत करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

नगरपालीका/ नगर पंचायत विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मीती करण्यात यावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर परिषद/ नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहिता व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!