
कारचा टायर फुटल्याने अपघात: एक ठार, दोन गंभीर
नागपूरवरून अंजनगावकडे जाणाऱ्या कारचा दर्यापूरात टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकी चालकला जबर धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन दुचाकी चालक गंभीर जखमी आहेत. दर्यापूरतील अमरावती रोड स्थित पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी 11 वाजता नागपूर येथून येणाऱ्या इंडिका कारचा समोरचा टायर अचानक फुटल्यामुळे कार वेगाने उलटली. याचवेळी योगेश मनोहर राऊत (वय 40 ) व अक्षय मनोहर राऊत (वय 35) रा. अंबाबाई सांगळुद, ता. जिल्हा अकोला हे आपल्या दुचाकीवरून अमरावतीकडे जात होते. उलटलेली MH 31- DC – 9672 क्रमांकाची कार त्यांच्या दुचाकीवर आदळली. या अपघातात योगेश मनोहर राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचा भाऊ अक्षय मनोहर राऊत हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच दर्यापूरतील आदर्श विद्यालयातील शिक्षक प्रशांत दिगंबर गावंडे (वय 40) हे सुद्धा आपल्या दुचाकीने शेतावर जात होते. सदर कार त्यांच्या दुचाकीवर सुद्धा आदळली.
यात प्रशांत यांचा उजवा पाय निकामी झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. इतका भीषण अपघात असतानाही कारमधल्या कोणालाही इजा झाली नाही. कार अब्दुल सलिम मोहम्मद अली नागपूर यांच्या मालकीचे असून ते स्वतः ही कार चालवत होते. कारमध्ये अब्दुल सलिम, त्यांची पत्नी सीमा तबस्सुम व त्यांच्या दोन मुली होत्या. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने कारमधील कुटुंबियांना बाहेर काढले. अंजनगाव येथील जावई असल्यामुळे ते आपल्या सासुरवाडीला जात होते. अपघात ग्रस्त कार मधील सर्वात छोटी मुलगी सकीना फातिमाचा आज वाढदिवस सुद्धा आहे. पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.