
ई-पीक पाहणी मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची कंझरा, शेलूबाजार येथील शेतकऱ्यांशी संवाद
वाशिम, दि. २८ (जिमाका) : ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक पेरणीबाबतची माहिती सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. याविषयी तलाठी, कृषि सहायक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना माहिती, प्रशिक्षण देवून पीक पेरणीविषयी नोंदणी शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २७ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा व शेलूबाजार येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मंगरूळपीरचे तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, श्री. मनवर, तलाठी अमित इंगोले, पांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद करून शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्यतक्ष शेतात जाऊन मोबाईल अॅपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतील, या अॅपमध्येह त्या क्षेत्राच्या अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे. शेतकऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीची तलाठ्यांमार्फत पडताळणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेतली जाणार आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पीक पेरणीची माहिती नोंदविण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या सहभागातून पारदर्शकपणे अचूक माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व तलाठी, कृषि सहायक यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या वापराविषयी माहिती देवून त्यांच्याकडून पीक पेरणीविषयी माहिती भरून घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हायवे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी केले आहे.