नागपूर

खासदार करंडक एकांकिका स्पर्धेची उत्सुकता ,मराठी कलाकार राहणार हजर

नागपूर दिनांक 25 ऑक्टोबर( सांस्कृतिक प्रतिनिधी)

न्यू होप आफ इंडिया’ने होणार प्रारंभ

समारोपाला सेलिब्रिटींची उपस्थिती

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने 28, 29 व 30 आक्टोबरला आयोजित खासदार करंडक एकांकिका स्पर्धेने नागपूरच्या रंगकर्मींमध्ये एक नवी उर्जा निर्माण झाली आहे. या स्पर्धेची उत्सुकता आता वाढलेली असून पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी (28 आक्टोबर) सकाळी 11.30 वाजता बहुजन रंगभूमीच्या ‘न्यू होप आफ इंडिया’ या एकांकिकेने स्पर्धेला प्रारंभ होईल.

लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी सकाळी 10 वाजता संस्कार भारतीच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल.वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील, यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर, तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांची प्रमुख उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच काही वेळात स्पर्धेला प्रारंभ होईल.

पहिल्या दिवशी सात, दुसऱ्या दिवशी नऊ तर तिसऱ्या दिवशी आठ एकांकिका सादर होणार आहेत. 31 आक्टोबरला सायंकाळी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा होईल. केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल, तर अभिनेते मकरंद अनासपुरे,  अभिनेत्री सुकन्या मोने, अभिनेते देवेंद्र दोडके या सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी मंजुषा पाटील व आनंद भाटे यांचा नाट्य संगिताचा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तीन दिवस सायंटिफिक सभागृहात जवळपास ३00 कलावंतांचा उत्सवच नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.

*सर्व* *एकांकिका* *ओटीटीवर*

जगभरात सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा बोलबाला आहे. प्रत्येकाला आपली कलाकृती ओटीटीवर यावी असे वाटत असते. त्याचाच विचार करून स्पर्धेतील सर्व एकांकिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने प्लेग्झीगो (PLEXIGO) या एपद्वारे सर्व एकांकिका जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे एक मोठी संधी नागपूरकर कलावंतांना मिळणार आहे. जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी व हिंदी माणूस असेल त्याला या सर्व एकांकिकांचा आस्वाद घेता येणार आहे.

या आहेत एकांकिका….

‘न्यू होप आफ इंडिया’, ‘अनंत मी’, ‘समर्पिता झलकारी’, ‘सूर्यास्त से पहले’, ‘जडे’, ‘फ्रिक्वेन्सी’, ‘टिवाल का खौफ’, ‘शहीद’, ‘फकीरनामा’, ‘मिसींग’, ‘आझादी-75’, ‘क्रांतीवीर’, ‘ती…ते’, ‘झेंडा घ्या हो झेंडा’, ‘दि प्लान अँड वध’, ‘नराग्रणी’, ‘आहुती’, ‘माझी बाजू माझा पक्ष’, ‘अवतरण’, ‘मृत्यूंजय’, ‘समरसौदामिनी’, ‘कॅप्टन’, ‘विरासत’ आणि ‘अगस्त से अगस्त तक’ या 24 एकांकिका स्पर्धेत सादर होणार आहेत.

आज खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा अनिल सोले यांनी  महिती दिली या प्रसंगी  प्रा मधूप पांडे, जयप्रकाश गुप्ता, प्रा राजेश बांगडी, बाळासाहेब कुळकर्णी, संजय गुळकरी, सौ रेणुका देशकर, चेतन कायरकर, किशोर पाटील, अभय देशमुख, भोलानाथ सहारे आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
Don`t copy text!