
जिल्हाधिकाऱ्यांनी केली नागठाणा शिवारात ई-पीक पाहणी
वाशिम, दि. 25 : जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी 24 ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील नगठाणा येथील शेतात भेट देवून ई-पीक पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सहायकट जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसिलदार विजय सावळे व तलाठी बोरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षन्मुगराजन उपस्थित शेतकऱ्यांशी बोलतांना म्हणाले की, ई-पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक शेतकरी कुटूंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची माहिती अड्रॉईड मोबाईलद्वारे या ई-पीक प्रणाली ॲपमध्ये भरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे पारदर्शक व बिनचुक सुविधा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्येक पीकाचे क्षेत्र समजणार आहे. पीकांची अचुक माहिती संकलीत होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
हवामानात दररोज बदल होत असतो. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्यामुळे पिकांचे नुकसान होत होते. अशावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतांना अडचणी व्हायच्या. नुकसानीचे पंचनामे करने कठीण जायाचे. मात्र आता ई-पीक पाहणी या डिजीटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदतच होणार असल्याचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांनी सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले
उपस्थित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी कशापध्दतीने करण्यात येते, याबाबतची माहिती प्रात्याक्षिकासह बघितली.