नागपूर

चालूसोबतच बकाया करवसुलीवरही लक्ष केंद्रित करा: स्थायी समिती सभापतींचे निर्देश

करवसुलीचा घेतला झोननिहाय आढावा

नागपूर, ता. २५ : चालू आर्थिक वर्षातील करवसुली हा दैनंदिन कार्याचा भाग आहे. नागरिक स्वत:हून कार्यालयात येऊन अथवा ऑनलाईन कराचा भरणा करतात. याव्यतिरिक्त कर विभागातील निरिक्षकांनी करवसुलीवर भर दिल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण नाही. बकाया कराची रक्कमही मोठी आहे. चालू आर्थिक वर्षातील करासोबतच बकाया रकमेच्या वसुलीवरही लक्ष केंद्रित करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. २५) करवसुलीसंदर्भात झोननिहाय आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी सदर निर्देश त्यांनी दिले. यावेळी कर व कर आकारणी विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, हरिश राऊत, अशोक पाटील, सुषमा मांडगे, किरण बगडे, साधना पाटील, कर विभागाचे कर निर्धारक व संग्राहक दिनकर उमरेडकर व कर अधीक्षक गौतम पाटील यांच्यासह सर्व झोनचे कर निरिक्षक उपस्थित होते.

सदर बैठकीत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी झोननिहाय करवसुली, महिन्याचे उद्दिष्ट आणि उद्दिष्टपूर्ती याचा आढावा घेतला. अर्थसंकल्पानुसार यावर्षीत नियमित २५६ कोटींव्यतिरिक्त बकाया करवसुलीवर भर द्यायचा आहे. किमान ३३२ कोटी मालमत्ता करापोटी वसूल होतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जे उद्दिष्ट आहेत, त्यानुसार पुढील सात महिन्याचे महिनानुसार उद्दिष्ट ठरवून नियोजन करावे व त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे निश्चितच मागील वर्षी करवसुलीवर त्याचा परिणाम झाला. यावर्षी मात्र, नियमित वसुलीसोबतच बकाया रकमेच्या वसुलीसाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशी आढावा बैठक घेण्यात येईल. मागील महिन्याचे नियमित आणि बकाया अशी आकडेवारी झोन सहायक आयुक्तांनी सादर करावी, असे निर्देश त्यांनी दिले. मनपाला होणाऱ्या उत्पन्नांच्या विविध स्त्रोतांपैकी मालमत्ता कर हे सर्वात मोठ स्त्रोत आहे. त्यामुळे यातून होणाऱ्या उत्पन्नासाठी प्रत्येकाने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व सहायक आयुक्तांनी मागील पाच महिन्यातील कर वसुलीची माहिती दिली आणि सप्टेंबर महिन्याचे उद्दिष्ट सांगितले. विवादित मालमत्तांच्या करवसुलीमध्ये येणाऱ्या अडचणीही यावेळी त्यांनी विषद केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!