
सण उत्सवानिमित्त सामाजिक कार्यातून सकारात्मक ऊर्जा व ऐक्य वाढवावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सण उत्सवानिमित्त सामाजिक कार्यातून सकारात्मक ऊर्जा व ऐक्य वाढवावे
जिल्हाधिकारी यांचे जिल्हा शांतता समिती सभेत आवाहन
गर्दी टाळण्यासाठी फेसबुक लाईव्ह व इतर ऑनलाईन समाजमाध्यमांचा वापर करा
मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण कॅम्पचे आयोजन करावे
यवतमाळ दि. 24 ऑगस्ट : जिल्ह्यात शांतता कायम राखण्यासाठी येणाऱ्या जन्माष्टमी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव व इतर सर्व सण गर्दी न करता शासनाच्या सूचनेनुसार साधेपणाने साजरे करण्यात यावे. या सणानिमित्त गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण कॅम्पचे आयोजन, शेतकऱ्यांना व कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मदत, विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप व नागरिकांमध्ये कोविड त्रिसुत्रीचे पालनाबाबत जनजागृती आदि सामाजिक उपक्रमांचे आयोजनातून सकात्मक ऊर्जा निर्माण करावी. विविध धर्माच्या लोकांमध्ये सौहार्दभाव वृद्धींगत करून सामाजिक ऐक्य वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा नियोजन सभागृह येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. सभेला आमदार नामदेव ससाने, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोविड अजून संपलेला नाही, इतर देशात कोरोनाची तीसरी लाट येवून गेलेली आहे, त्यामुळे आपल्याकडेही तीसरी लाट येईल हे गृहीत धरून उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोर पालन केल्यास तीसरी लाट पुढे ढकलता येईल व लसिकरणाच्या माध्यमातून त्याची तिव्रता कमी करता येईल. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण उत्सव साधेपणाने साजरे करावे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृद्धींगत करण्यासाठी व हिंसाचार टाळण्यासाठी 5 सप्टेंबर पर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी आरती व इतर आराधनेचे कार्यक्रम फेसबुक लाईव्ह व इतर समाजमाध्यमाद्वारे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचवावे. यामुळे निश्चितच गर्दी कमी होऊन कोविडचा फैलाव होणार नाही, असे सांगितले. शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणेशमुर्ती 2 फुट मर्यादेत असून मिरवणुकीस बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार ससाने यांनी उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी शहरात जागा निश्चित करून देण्याची मागणी केली.
यावेळी सर्वश्री डॉ. प्रेम हनमते, भिमराव कांबळे, ॲड. जयसिंह चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, बिपीन चिद्दरवार, ॲड. बी.जी.देशपांडे, प्राचार्य ना.म.जावळकर, सौ. निलिमा काळे, फिरोज सलीम, डॉ. प्रदिप नैताम, प्रा. विनीत माहुरे तसेच नेर, पुसद, दारव्हा, वणी, आर्णी, दिग्रस, यवतमाळ व जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शांतता समितीच्या सदस्यांनी सामाजिक एकोपा व शांतता कायम राखण्यासाठी प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था तसेच विविध विकासात्मक बाबीवर सूचना मांडल्या.