
वादग्रस्त पाटणी कमर्शिअल कॉम्पलेक्सचे संचालक विवेक पाटणी व इतर संचालक यांचेविरूद्ध चौकशीचे आदेश अखेर धडकले
वाशीम : वाशीम येथील वादग्रस्त पाटणी कमर्शिअल कॉम्पलेक्स येथे झालेल्या फसवणुक व चुकीच्या केलेल्या कामाबाबतच्या चौकशी करण्याविषयीची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील यांनी मा. मुख्यमंत्री, नगर विकासमंत्री यांना केली होती. त्या गंभीर तक्रारीची नगर विकास विभागाने दखल घेऊन जिल्हाधिकारी वाशीम, उपसचिव, महसुल व वनविभाग व उपसचिव गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना तुलसी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. ली. (पाटणी कमर्शिअल कॉम्पलेक्स) यांचे संचालक विवेक पाटणी व इतर संचालकांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश अखेर धडकले.
वाशीम शहरामध्ये तुलसी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. ली. (पाटणी कमर्शिअल कॉम्पलेक्स) नावाने व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अनियमितता झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी वाशीम यांना दोन आठवड्यात नगर परिषद वाशीमच्या संबंधीत असलेली बांधकाम मंजुरी व त्या अनुषंगीक सर्व मुद्याची सखोल चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या वादग्रस्त कॉम्पलेक्सची उभारणी केल्यानंतर ज्या व्यवसायीकांना या कॉम्पलेक्समध्ये गाळे घेतले होते त्यांना अद्यापपर्यंत खरेदी खत न करून दिल्यामुळे आजही शासनाच्या दस्ताऐवजावर भोगवटदार म्हणून असल्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसीक नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत व त्याच्याशी संबंधीत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्याकरिता नगरविकास विभागाने उपसचिव महसुल व वनविभाग मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्याच संबंधाने महाराष्ट्र फ्लॅट मालकी हक्क कायदा 1963 त्याचप्रमाणे RERA कायद्याअंतर्गत चौकशीचे आदेश उपसचिव, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांना दिले. शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते यांच्या गंभीर स्वरूपाच्या तुलशी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. ली. (पाटणी कमर्शिअल कॉम्पलेक्स) च्या बाबत दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल शासनाने घेतली असून तेथील व्यवसायिकांना न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मते यांनी सांगितले.