नागपूर

नागपुरातील विविध विसर्जन स्थळांची माहिती एका क्लिकवर,शहरात दहा झोनमध्ये २०४ ठिकाणी ३९० कृत्रिम टॅंकची व्यवस्था

नागपूर दिनांक 6 सप्टेंबर ( शहर प्रतिनिधी)

गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत २०४ विविध ठिकाणी ३९० कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

गणेश विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे वेब लिंक जारी करण्यात आली आहे. मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या या https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location लिंकवर जाऊन नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध २०४ भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच ४ फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत.

शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत. जागोजागी निर्माल्य कलशाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या विसर्जनस्थळी उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव येथील एअरफोर्स बाजूने उपस्थित राहणार आहेत. तसेच सक्करदरा तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलाव परिसरात निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत.

गणेश विसर्जन संदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच बैठक घेउन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्यात ४ फूटाखालील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये करण्यात यावे. तसेच ४ फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी होईल.

कोराडीमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था जसे क्रेन, बॅरिकेटिंग, रोषणाईची उत्तम सुविधा करण्यात यावी. तसेच स्वच्छता सुद्धा ठेवावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!