नागपूर

पाच वर्षात नागपूर प्रदूषण्रमुक्त करा : ना.नितीन गडकरी

नागपूर, ता. १६ : नागपूर शहरात अनेक नवे प्रयोग पहिल्यांदा झाले. आता ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण या तीनही क्षेत्रात काम आवश्यक आहे. त्याची आजची मानकं ठरवून पाच वर्षांत नागपूर शहराला प्रदुषणापासून मुक्ती मिळेल, असा कार्यक्रम नागपूर महानगरपालिकेने तयार करावा. नगरसेवकांच्या पुढाकाराने दरवर्षी सुमारे पाच लाख झाडे लावण्यात यावी जेणेकरून पर्यावरणाच्या बाबतीत नागपूर क्रमांक एकचे शहर व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरातील १२ उद्यांनांमध्ये जपानच्या तंत्रज्ञानावर आधारीत लघु सांडणापाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात येत आहे. यापैकी तीन प्रकल्पांचे लोकार्पण रविवारी (ता. १५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शंकरनगर उद्यानात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले, निशांत गांधी, रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहे. सांडपाणी शुद्ध करून वीज केंद्राला दिले जाते. त्यातून ५० ते ६० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतात. काही वर्षांपूर्वी जपान सरकारच्या माध्यमातून नरेंद्र नगर येथे लघु सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. तशाच प्रकल्पासाठी आता मनपाने पुढाकार घेऊन सुमारे १२ प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पातून शुद्ध होणारे पाणी उद्यान, इमारतींच्या बांधकामाकरिता देण्यात येणार आहे. पूर्वी पेंचमधून शुद्ध करून येणारे पाणी दिल्या जात होते. यामुळे आता नागपूरकरांच्या हक्काचे पिण्याचे पाणी वाचणार आहे. ‘वेस्ट टू वेल्थ’ असा हा कार्यक्रम आहे. नागपूरच्या नागनदीतून ‘वॉटर ट्रान्सपोर्ट’ व्हावे, यादृष्टिकोनातून कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी २४०० कोटी रुपये मंजूर झाले आहे. पुढील १५ दिवसात यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती होईल. नागपुरातील २४० मैदाने चांगली करायची आहेत. त्यापैकी १२० मैदाने झालीत. या मैदानांवर नासुप्र तर्फे तयार करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी देण्यात येईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले.

बायोफुअल संदर्भात बोलताना ते म्हणाले, नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बंद व्हावे, असे आपणाला वाटते. नागपूर शहरात पूर्णत: इथेनॉलचा इंधन म्हणून वापर व्हावा. यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. ई-वाहतुकीला यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. पाण्यातूनच तयार होणाऱ्या ‘ग्रीन हायड्रोजन’च्या निर्मितीसाठीही आता मनपाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या १२ लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापरत प्रकल्पाबद्दल त्यांनी महापौर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि कार्यकारी अभियंता श्वेता बनर्जी चे कौतुक व अभिनंदन केले.

 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाण्याचे ९० टक्के प्रदूषण मनपा हद्दीतील सांडपाण्यामुळे होते तर १० टक्के उद्योगातील पाण्यामुळे होते. पंतप्रधानांनी नमामि गंगे कार्यक्रम सुरू केला ज्याचे प्रमुख नितीनजी गडकरी यांना केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे यंदा पहिल्यांदाच कुंभमेळ्यानंतर गंगा स्वच्छ दिसली. एकंदरच कुठल्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामाच्या विकेंद्रीकरणाची गरज असल्याचे त्यांनी विषद केले.

प्रस्तावनेतून महापौर दयाशंकर तिवारी यांनी लघु सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले, ही संकल्पनाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पुढाकारातून नरेंद्र नगरला असा प्रकल्प सुरू झाला होता. असे पुन्हा व्हावे यासाठी त्यांनीच वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनात आता जपानच्या जोकोसाऊ कंपनीच्या तंत्रज्ञानावर आधारित १२ प्रकल्प सुरू करीत आहोत. त्यातील पूर्व नागपूर, दिघोरी घाट आणि शंकरनगर उद्यान येथील तीन प्रकल्प भूमिपूजनानंतर केवळ एक महिन्याच्या कालावधीत होत असल्याने प्रयत्न सार्थकी लागल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प संपूर्णत: सौर ऊर्जेवर असून केवळ पंपिंगसाठी वीज लागेल. या प्रकल्पामुळे वर्षभरात चार कोटी लिटर पाण्याची बचत होईल. पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी ज्या कंपनीकडे आहे, त्याच कंपनीला पाणी विकण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. जपान असे १०० प्रकल्प पीपीपी तत्वावर नागपुरात करण्यास तयार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन जलप्रदाय समितीचे माजी सभापती विजय झलके यांनी केले. आभार धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

लाल टँकरने होणार पाणीपुरवठा

लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पातून बांधकामांना लाल टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मनपाद्वारे यासाठी चार हजार लीटरचे विशेष टँकर राहणार असून या टँकरचा रंग लाल राहिल. त्यावर ‘पुनर्वापरासाठी पाणी’ (रिसायकल वाटर) असे लिहिलेले असेल. चार हजार लिटरच्या एका टॅंकरकरिता पाण्याचा खर्च २०० रुपये व डिझेल आणि वाहतूक खर्च ३०० रुपये असे एकूण ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर अशा लाल टँकरला ना. नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचे संचलन जपान सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डायकी ॲक्सिस (Daiki Axis) यांच्या सहकार्याने राईट वॉटर (RITE Water),. नागपूर ह्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!