
वर्धेत जिल्हा कृषी कार्यालयाचे लोकार्पण
वर्धा, दि 16 :- स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विषय असणारे जिल्हा कृषी कार्यालयाचे उदघाटन करून पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती किफायतशीर कशी करावी याचे माहिती देण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल. कृषी विभाग या जिल्ह्यातील शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा हात नक्कीच देईल अशी आशा या कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.
या जिल्ह्यातील रोपवाटिकेच्या माध्यमातून चांगली रोपे शेतकऱयांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प सुद्धा यानिमित्ताने करू आणि शेतकऱयांचे जीवन सुजलाम – सुफलाम करण्यासाठी हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.
आंबेडकर चौकाच्या बाजूला असलेले कृषी विभागाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री सुनील केदार यांनी स्वातंत्र्यदिनी केले. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, डॉ सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ विद्या मानकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रदर्शनीची त्यांनी पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील पाच सेंद्रिय शेती गटांना सेंद्रिय उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी पालकमंत्री यांचे हस्ते वाहनांची किल्ली देण्यात आली.