
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील पुतळ्यांवर आकर्षक रोषणाई
*नागपूर, ता. १४ :* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी आकर्षक रोषणाई केली.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुतळे हे आम्हाला प्रेरणा देत असतात. महापुरुषांच्या या पुतळ्यांपासून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी, हा पुतळे उभारण्यामागील उद्देश असतो. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. वर्षभर यानिमित्ताने शहरात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘सुपर ७५’, शहरात ७५ ऑक्सिजन झोन, ७५ हेल्थ पोस्ट असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यापुढे मनपाच्या सहकार्याने पुतळ्यांच्या देखभाल करणार आहेत. याअंतर्गत आज १४ ऑगस्ट रोजी या सर्व पुतळ्यांना पाण्याने स्वच्छ करण्यात आले. त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. रात्री आठ वाजता विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून ७५ चौकात स्वातंत्र्याचा जागर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.