
स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन
वाशिम, दि. १४ (दिपक भारुका) : येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, १५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वा. होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या बाजूला काटा रोड परिसरातील १.६० हेक्टर जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे बहुद्देशीय कृषि संकुलाची उभारणी केली जाणार आहे. याकरिता नियोजन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी ४४ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे ‘आत्मा’चे प्रभारी प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी कळविले आहे.