
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरातील जातीवाचक वस्त्यांची, चौकांची तसेच रस्त्यांची नावे बदलण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तातडीने पुढाकार घेतला. सर्वच झोनअंतर्गत येणारी अशी नावे लवकरात लवकर बदलण्यात येतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज दिली.
गांधीबाग झोन कार्यालयात यासंदर्भात बुधवारी (ता. ११) बैठक पार पडली. बैठकीला गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका कांता रारोकर, सरला नायक, विद्या कन्हेरे, जिशान मुमताज, आयेशा उईके, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, राजेश घोडपागे, सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या पत्रावर चर्चा करून गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या जातीवाचक वस्त्यांच्या नावांची यादी वाचण्यात आली. विविध धर्मातील व्यक्तींच्या सहमतीने त्या नावांना महापुरुषांच्या नावात रुपांतरित करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा यावर्षी अमृतमहोत्सव आहे. ‘जाती तोडो, समाज जोडो’ याअंतर्गत जातींच्या नावावर असलेल्या नावांना महापुरुषांच्या नावात रुपांतरित करण्याचा ठराव यापूर्वीच महानगरपालिकेने महासभेत घेतला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांचेही यासंदर्भात पत्र प्राप्त झाले. यापूर्वीच एका नाल्याचे नाव ‘नॉर्थ कॅनल’ करण्यात आले. आपण पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा अशाच एका परिसराचे नाव कन्नमवार नगर असे केले. अशा पद्धतीने पूर्वी हे काम संक्षिप्त स्वरूपात आम्ही करता होतो. मात्र, आता ही मोहीम हातात घेतली असून विविध समाजातील लोकांना विश्वासात घेऊन नामबदलाचे कार्य सुरू करीत आहोत. जर जातीवाचक नाव नसेल तर व्यक्तीसुद्धा त्या चाकोरीच्या बाहेर येऊन विचार करेल, या उद्देशातूनच आता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्याचा नागपूर महानगरपालिकेचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.