पश्चिम विदर्भ

विद्यार्थ्यांनीच्या दोन्ही किडन्या फेल, आर्थिक मदतीचे आई वडिलांचे आव्हान

यवतमाळ : अत्यंत गरीब घरातील मुलगी पदवीधर झाली नोकरी लागावी म्हणून तिने नर्सिंगला प्रवेश घेतला. एक दिवस अचानक पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगितले. हे ऐकून बूट पॉलिश करणारे वडील व लोकांच्या घरची धुणीभांडी करणाऱ्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. परंतु, आईने लाडक्या पोरीला एक किडनी देण्याचे ठरवून तिच्यात जगण्याची आशा निर्माण केली. मात्र, किडनी प्रत्यारोपासाठी १५ लाखांचा येणाऱ्या खर्चाची तजवीज कशी करायची, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला.

रविदासनगरात देवानंद सरोदे राहतात. ते एकवीरा चौकात बूटपॉलिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची पत्नी संतोषी लोकांच्या घरची धुणीभांडी करते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. मुलगा चेतन बी. कॉम असून, नोकरी नसल्याने शहरात मास्क विकतो. त्यांनी सुनैना हिला बी.ए.पर्यंत शिकविले. तिने नोकरी मिळावी म्हणून पुढे नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

त्यांनी उधारउसणे करून गुजरातमधील नडियाद येथील मुजलीभाई पटेल युरोलॉजीकल हॉस्पिटल येथे नेले. तेथे तिच्यावर १८ मार्चपासून उपचार सुरू आहे. तेथील डॉ. अभिषेक कदम यांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. तिच्यावर लवकरच नडियाद येथील रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

त्यासाठी १५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. एवढी रक्कम कशी जुळवायची असा, प्रश्‍न मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांसमोर उभा ठाकला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व संघटनांनी आमच्या पोरीचा जीव वाचविण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन सुनयनाच्या आई-वडिलांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!