नागपूर

शेतकरी करू शकणार ई पीक पाहणी ॲपव्दारे पिकांची नोंदणी

जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून राबविणार -जिल्हाधिकारी

नागपूर दि.10 : महसूल विभागाने पिक पाहणीसाठी ‘ई-पीक पाहणी’ या स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी ॲपव्दारे त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतील. यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. तरी महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा असे, आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज दिले.

बचतभवन येथील ई-पीक पाहणी कार्यक्रमासंबंधी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी महसूल सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार जगदीश काटकर उपस्थित होते.

प्रास्ताविकात श्रीमती गंधे यांनी नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर 20 तालुक्यात राबविण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचा शासन निर्णय 30 जुलैला घेण्यात आल्याचे सांगितले. त्यांनतर प्रात्यक्षिकांव्दारे प्रशिक्षण देण्यात आले.

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात आले आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. त्यामुळे ही पीक पाहणी पध्दत अधिक अचुक व सोपी होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ॲपव्दारे आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करायची आहे .

9 ते 14 ऑगस्ट दरम्यान ई-पीक पाहणी प्रकल्प प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह असून त्यादरम्यान याबाबतीत क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, ॲप हस्तांतरण करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

प्रशिक्षणानंतर अधिकाऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले. या प्रशिक्षणाला सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व कृषी विभागाचे अधिकारी, तसेच टाटा ट्रस्टचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!