पूर्व विदर्भ

15 महिन्यानंतर भंडारा जिल्हा कोरोनामुक्त

योग्य नियोजन व चाचण्यावर दिला भर

भंडारा,दि.6:- ट्रेसिंग, टेस्ट व ट्रिटमेंट या त्रिसुत्री सोबतच योग्य नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून उपचाराखाली असलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 15 महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला.

देशात व राज्यात मार्च 2020 च्या दरम्यान संसर्गजन्य आजार कोरोनाने थैमान घातले असतांना भंडारा जिल्ह्यात पहिला रुग्ण 27 एप्रिल 2020 रोजी गराडा (बू.) येथे आढळून आला. त्यानंतर रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी असला तर संसर्ग कमी होतांना दिसत नव्हता. जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद 12 जुलै 2020 रोजी झाली. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र अचानक दुसरी लाट आल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव जून महिन्याच्या मध्यापर्यंत कायम होता.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने या दरम्यान योग्य नियोजन करत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात यश संपादन केले. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, त्यांची तपासणी-चाचणी व त्यावर वेळेत उपचार या सूत्राचा अवलंब करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात आली. आज 6 ऑगस्ट रोजी शेवटचा रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि जिल्हा कोरोनामुक्त झाला. या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे 1133 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.

आज 578 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 832 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. यात 59 हजार 809 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या तर 58 हजार 676 व्यक्ती कोरोना आजारातून बऱ्या झाल्या. जिल्ह्यात आज एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे.

मार्च 2020 मध्ये सुरू झालेल्या कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वीपणे नियंत्रण मिळवले होते. मार्च 2021 च्या शेवटी शेवटी आलेल्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्ण वाढीचा वेग 18 एप्रिल 2021 पर्यंत कायम राहीला. 12 एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे 1 हजार 596 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 1 मे रोजी सर्वाधिक 35 मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर केलेल्या ‘ब्रेक द चैन’ व विविध उपाय योजनामुळे रुग्ण संख्या कमी कमी होत गेली. 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 1 हजार 568 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचीच संख्या अधिक राहली आहे.

15 फेब्रुवारी 2021 रोजी क्रियाशील रुग्णांचा 97 असलेला आकडा 18 एप्रिल रोजी 12 हजार 847 वर पोहचला होता. 19 एप्रिल रोजी रुग्ण बरे होण्याचा दर 62.58 टक्के होता आता तो 98.11 टक्क्यांवर गेला आहे. 12 एप्रिल रोजी 55.73 टक्के असलेला पॉझिटिव्ही दर आज शून्य टक्क्यांवर आला आहे. 8 एप्रिल पर्यंत एकेरी आकड्यात असलेली मृत्यू संख्या 9 एप्रिल पासून 12 मे पर्यंत दोन अंकी संख्येत होती. आत ती पुन्हा शून्यावर आली आहे.

• भंडारा जिल्हा कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाचे सामूहिक प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरले आहे. आज जिल्ह्यात क्रियाशील रुग्ण शून्य असले तरी यापुढचा काळ सतर्कता बाळगावीच लागेल. थोडासाही गाफिलपणा चालणार नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियमांचे अधिक जबाबदारीने पालन करणे आवश्यक आहे. कोरोनामुक्त झाला असला तरी मास्क वापरणे, हात स्वच्छ धूणे व सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.

– संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!