नागपूर

पर्यावरणपूरक ‘आपली बस’ व्यवस्था निर्माण करण्यास प्रयत्नशील : जितेंद्र (बंटी) कुकडे

नागपूर, ता. ६ : नागपूर शहरातील मनपाची परिवहन सेवा ही पूर्णत: ईलेक्ट्रिक बस व सीएनजी बसवर असावी अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना आहे. याच संकल्पनेला प्रतिसाद देत दुस-यांदा परिवहन समिती सभापती म्हणून जबाबदारी स्वीकारतानाही संकल्पना प्रत्यक्षात उतरवित नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक ‘आपली बस’ व्यवस्था निर्माण करण्यास प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी केले.

 

परिवहन समिती सभापती पदासाठी शुक्रवारी (ता.७) पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी आर.विमला यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे नामांकन अर्ज सादर केले. समिती सदस्य उषा पॅलेट, शेषराव गोतमारे, रूपा राय, राजेश घोडपागे, नागेश मानकर आणि विशाखा बांते हे त्यांचे सूचक व अनुमोदक होते. समिती सभापती पदासाठी एकमात्र अर्ज आल्यामुळे जितेंद्र (बंटी) कुकडे यांची बिनविरोध निवड झाल्याची पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परिवहन व्यस्थापक तथा उपायुक्त रवींद्र भेलावे, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, अरुण पिंपरुडे, योगेश लुंगे उपस्थित होते.

 

निवडीनंतर परिवहन समिती सभापती कक्षामध्ये जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पदग्रहण केले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, माजी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, समिती सदस्य नितीन साठवणे, राजेश घोडपागे, उषा पॅलेट, रूपा राय, नागेश मानकर, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, अभय गोटेकर, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका एकेक पाउल पुढे टाकत आहे. यापूर्वी मनपाच्या परिवहन सेवेमध्ये महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ ईलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आता १५ स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बसेसची भर पडत आहे. मनपाद्वारे यापूर्वी ८३ डिझेल बसेसचे सीएनजी मध्ये परिवर्तन करण्यात आले. पुढे १६७ बसेस सीएनजी मध्ये परिवर्तीत करणे बाकी आहे. एकूणच या सर्व पर्यावरणपूरक पुढाकारामुळे येत्या काळात शहरातील अर्धापेक्षा जास्त धूर सोडणा-या बसेस कमी होणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दुस-यांदा परिवहन समितीची जबाबदारी सोपविल्याबद्दल सत्तापक्षासह सर्व पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभारही मानले. परिवहन समितीमध्ये एकूण १३ सदस्य असून यामध्ये भाजपचे १०, काँग्रेसचे २ आणि बसपाचे एक सदस्य आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!