
नागपुरात संघाच्या मुख्यालयासमोर काँग्रेस भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले
नागपूर : संघ मुख्यालयाजवळ आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी झाला. “संघ मुख्यालय से संसद तक” या आशयाची एक रॅली युवक काँग्रेसच्या नागपुरातील काही कार्यकर्त्यांनी काढली होती. महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा निषेध करत नागपुरातून दिल्लीपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात ही रॅली आज नागपुरातून दिल्लीला रवाना होणार होती. त्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज महाल परिसरातील संघ मुख्यालयाजवळ पोहोचले.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संघ मुख्यालय जवळील गल्लीतून जाण्याचा विचार होता. मात्र, ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना कळताच ते देखील संघ मुख्यालयाजवळ गोळा झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्यानंतर शाब्दिक वादाला सुरुवात झाली.
काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके आणि त्यांचे सहकारी संघ मुख्यालयाजवळून रॅली नेण्यावर ठाम होते. तर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.