नागपूर

आता सीताबर्डी बाजारपेठ होईल ‘स्मार्ट’, ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चा शुभारंभ

नागपूर, ता. ३० : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या सीताबर्डी येथील ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३०) करण्यात व्हेरायटी चौकात करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ, ‘स्टेज वन’मध्ये सहकार्य करणारी माजी बायसिकल मेयर दीपांती पॉल, स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, एनएसएससीडीसीएल पर्यावरण विभागाच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, डॉ. पराग अरमल, मुख्य नियोजक राहुल पांडे, अमित शिरपूरकर, ई -गव्हर्नन्स विभागाचे अनुप लाहोटी, बर्डी व्यापारी असोसिएशनचे सदस्य संजय नबीरा, ग्लोकल मॉलचे अनुप खंडेलवाल, अर्बन प्लानर हर्षल बोपर्डीकर आदी उपस्थित होते.

सीताबर्डी हे नागपूर शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातून येथे नागरिक खरेदीकरिता येतात. ‘स्ट्रीट फॉर पीपल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आता या बाजारपेठेला नवे स्वरूप प्रदान करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येथे खरेदीकरीता येणा-या नागरिकांच्या दृष्टीने बाजार सुंदर आणि सुरक्षित करण्याकरिता स्मार्ट सिटीच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘नागपूर स्मार्ट सिटी’च्या वतीने ‘स्ट्रीट फॉर पीपल’ अंतर्गत बर्डी, महाल बाजारपेठ आणि नेबरहुड साईटसाठी ट्रॅफिक पार्क आणि सक्करदरा तलाव स्ट्रीटची निवड करण्यात आली आहे. ‘स्मार्ट सिटी’तर्फे यासाठी डिझाईन स्पर्धा घेण्यात आली. त्यात बर्डी मार्केट आणि सक्करदरा नेबरहुड साईटची निवड करण्यात आली. केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुरस्कार प्राप्त डिझाईनची चाचणी करण्यासाठी सीताबर्डी मार्केटमध्ये शुभारंभ करण्यात आला.

उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर स्मार्ट सिटीला केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे एक कोटीचा पुरस्कार ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’उपक्रमाअंतर्गत मिळाला आहे. ‘स्मार्ट सिटी’तर्फे १८ किमीची ‘बायसिकल लेन’ तयार करण्यात येत आहे. यामध्ये सायकल चालविणाऱ्यांचेसुध्दा मोठे सहकार्य लाभत आहे. ‘स्मार्ट सिटी’तर्फे सीताबर्डी बाजारपेठेला सुरक्षित व सुंदर बनविण्याकरीता ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत बर्डी बाजारपेठेत मोठी गर्दी असते आणि वाहतुकीच्या वर्दळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ‘स्मार्ट सिटी’तर्फे हॉकर्स, वाहने तसेच दुकानदारांसाठी नियोजन केले जात आहे. यासाठी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी व ग्लोकल मॉलचे अनुप खंडेलवाल यांचे सहकार्य घेत असल्याचे महापौरांनी सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, नागपूरसाठी ही अभिमानाची बाब आहे की संपूर्ण देशाच्या प्रमुख ११ शहरांमध्ये नागपूर स्मार्ट सिटीची निवड सायकलिंगला पुढाकार देण्यासाठी झाली आहे. केंद्र शासनातर्फे एक कोटीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. ‘स्मार्ट सिटी’ तर्फे मागील वर्षभरापासून सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल आणि लोकसुध्दा निरोगी राहतील. याचा पुढचा टप्पा म्हणून बर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना महामारीमध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी या उपक्रमाच्या माध्यमाने करण्याचे प्रयत्न राहील. नावीन्यपूर्ण कल्पनेला सगळयांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील १५ दिवस स्मार्ट सिटीच्या वतीने प्रायोगिक तत्वावर व्हेरायटी चौकापासून ३०० मीटर पर्यंत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये हॉकर्सना सीताबर्डी मेन रोडच्यामध्ये बसून नियोजनबध्द पध्दतीने जागा करुन देण्यात येईल. दोन्ही बाजूने नागरिकांसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था राहील. मुख्य बाजारपेठ ‘व्हेईकल फ्री झोन’ असल्यामुळे या रस्त्यावर सर्व प्रकाराच्या वाहनांवर बंदी घालण्यात येईल. जेणेकरुन येथे येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण प्राप्त होईल. तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना ई-रिक्षाची व्यवस्था राहील. नागपूरसाठी हा नवा उपक्रम असला तरी याचा मोठ्या प्रमाणात दुकानदारांना व हॉकर्सला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, प्रोजेक्ट लीड डॉ. पराग अरमल या उपक्रमामध्ये काम करीत आहेत.

डॉ.उमरेडकर यांनी सांगितले की, प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये दुकानदार, हॉकर्स व नागरिकांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना ‘वॉकींग फ्रेंडली’ स्ट्रीट मार्केट उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये कोव्हिड – १९ नियमांचे पालन करुन बर्डी बाजारपेठेला नवीन दिशा देऊन ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. या चॅलेंजचा उद्देश शहरांमध्ये ‘स्ट्रीट फॉर पीपल’ची एकीकृत संकल्पना स्टेकहोल्डर्स व नागरिकांच्या माध्यमातून तयार करण्याची आहे. ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आणि ‘नेबरहुड स्ट्रीट’ संकल्पना आर्थिक व्यवस्थेला नवीन चालना प्रदान करेल तसेच सुरक्षित व बालकांसाठी सुध्दा फ्रेंडली असतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!