
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
नागपूर दि. 29 : नागरिकांच्या समस्या व तक्रारी सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे जिल्हास्तरीय लोकशाही दिन. कोरोनाच्या महामारीमुळे दरम्यानच्या काळात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत नव्हते. आता प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. लोकशाही दिनाकरीता सोमवार (2 ऑगस्टपर्यंत) अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांपैकी प्रथम प्राप्त 25 तक्रारीशी संबंधित नागरिक हे व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी होऊ शकतील.
लोकशाही दिनात नागरिकांनी दिलेले निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे नसावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज द्यावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्याशी संबंधित तक्रार निवेदनासाठी त्या कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याने त्या कार्यालयाशी संबंधित तक्रारी या लोकशाही दिनात स्वीकारल्या जाणार नाहीत.
या लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपील प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रीयेचे अंतर्भाव असलेली प्रकरणे, सेवा, नौकरी, आस्थापनाविषयक बाबी, कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेली प्रकरणे, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेली प्रकरणे या बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याची तक्रारकर्त्यानी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी कळवले आहे.
00000