
नाशिकमध्ये मनसे अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनपा निवडणूक लढविणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे नेते अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिकेची जबाबदारी अमित ठाकरेंवर देण्याची शक्यता असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठं विधान केलं आहे.
अमित ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडेसोबत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देशपांडे यांनी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे, दत्तक घेऊ योजनाही फसली आहे, असा टोलाही यावेळी देशपांडे यांनी लगावला आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकात मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कोणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, नाशिकचं संगोपन राज ठाकरेंनी मनापासून केलं आहे. आगामी निवडणुकीत जुन्या- नव्या कार्यकर्त्यांचा संगम करु, असंही त्यांनी म्हटलं आहे.