नागपूर

डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्या

· कोरडा दिवस पाळण्याला प्राधान्य

· साचलेले पाणी आढळल्यास संबधितांवर कठोर कारवाई

· जिल्ह्यात डेंग्यूच्या 374 रुग्णांची नोंद

· बालकांमध्ये डेंग्यूचे रुग्ण

नागपूर, दि. 27 : डेंग्यू आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असून, विशेषत: लहान मुलांमध्येसुद्धा हे प्रमाण असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही. तसेच घर व परिसरात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेतानाच डेंग्यूच्या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले.

नागपूर जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे 374 रुग्ण आढळले असून, यामध्ये ग्रामीण भागात 212 तर शहरातील 162 रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करण्यासोबतच लोकजागृतीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिलेत. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनंदिन अहवाल सादर करण्यासंदर्भातही संबंधित यंत्रणांना यावेळी सूचना देण्यात आल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासोबतच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हाधिकारी विमला आर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. प्रकाश देव, टास्क फोर्सचे डॉ. मिलींद भृशुंडी, डॉ. सरनाईक, इंदिरा गांधी महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सोनवणे तसेच डॉ. अभिमन्यू निसवाडे, डागा रुग्णालय, एम्स तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत असून, यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी कोरडा दिवस पाळण्यासोबतच विविध उपाययोजनांबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्या भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करावे. ज्या घरामध्ये पाणी साचलेले आढळेल अशा घरांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी. नागरिकांनीही आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळून घरातील संपूर्ण भांडे रिकामे करावेत. तसेच कुलर व ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठू शकते, अशा सर्व भागात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ग्रामीण भागात 212 रुग्ण आढळले असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी तसेच खंडविकास अधिकारी यांनी तालुकानिहाय विशेष अभियान राबवावे. नागपूर ग्रामीण तसेच उमरेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे विशेष दक्षता घ्यावी. नागपूर शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने विशेष अभियान राबवावे, असे निर्देशही यावेळी बैठकीत देण्यात आले.

जिल्ह्यात डेंग्यूसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असून, जिल्हा प्रशासनाने तसेच महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना करताना विभागीय आयुक्तांनी सामाजिक संस्था तसेच युवकांनी रक्तदानासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संपूर्ण सहकार्य असल्याचे यावेळी सांगितले.

 

*****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!