नागपूर

कचरा संकलन कंपनी प्रमुखांचे मत मागवा : अविनाश ठाकरे

एजी इन्व्हायरो आणि बीव्हीजीवरील चौकशी समितीच्या बैठकीत निर्देश

नागपूर, ता. २७ : शहर स्वच्छते अंतर्गत कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी मनपाद्वारे नियुक्त एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या मार्फत समितीच्या समक्ष करण्यात आलेले आरोप गहन असून कंपनीच्या प्रमुखांचे यासंदर्भात मत मागविण्यात यावे, असे निर्देश सत्तापक्ष नेते तथा समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.

एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर होणारी कारवाई तसेच कंपनीद्वारे बेकायदेशीर काम होत असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करणे याकरिता महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या आधीच्या बैठकीतील निर्देशानुसार कार्यवाहीचा आढावा घेण्यासंदर्भात मंगळवारी (ता.२७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, समिती सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सदस्य उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनल अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समितीच्या ९ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आमदार तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके आणि विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आपले मत मांडण्यांसदर्भात समितीकडे पत्र सादर केले होते. त्यानुसार मंगळवारी (ता.२७) तानाजी वनवे हे प्रत्यक्षात उपस्थित झाले तर आमदार प्रवीण दटके लेखी स्वरूपात आपले मत नोंदविणार आहेत. गत बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे निदर्शनास आल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्या सर्व बयाणांचे कंपनीच्या प्रतिनिधीकडून वाचन करण्यात आले. मागील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन आणि उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत यांनी दहाही झोनमध्ये नगरसेवकांसोबत बैठक घेतल्या. दहाही झोनमधील अहवाल समितीद्वारे निगम सचिवांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला.

कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत मत नोंदविताना विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले की, दोन्ही कंपनींच्या व्यवस्थापकांची वागणूक अयोग्य स्वरूपाची असून त्यांचेकडून नगरसेवकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसांनंतर कचरा संकलन गाड्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी ते नगरसेवकांकडे तक्रार करतात, तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क करता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले.

समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांद्वारे नोंदविण्यात आलेले मत गांभीर्याने घेत दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांकडे कुठलेही पुरावे असल्यास त्यांनी ते समितीपुढे ठेवण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये मांडलेले मुद्दे गंभीर असून याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. दोन्ही कंपन्यांसदर्भात संपूर्ण विस्तृत माहिती पुढे यावी यासाठी संबंधित कंपनी प्रमुखांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!