
कोरोना लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवा – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
• कोरोना लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा
वाशिम, दि. २७ : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस ही प्रभावी उपाय आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यातील पात्र नागरिकांचे लसीकरण अधिक गतीने करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आज, २७ जुलै रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती होती. तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी या बैठकीमध्ये दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जावून कोरोना लसीकरणाबाबत माहिती द्यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दवंडी देणे, ध्वनिक्षेपकावरून माहिती देवून गावामध्ये जनजागृती करून लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवून पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्या भागात कमी लसीकरण झाले आहे, त्याठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने लवकरच तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यात येईल. यामध्ये ज्या गावांमधील लसीकरण कमी आहे, अशा गावातील तलाठी, ग्रामसेवक यांचाही आढावा घेवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सध्या लसींची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या अंतर्गत लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. लसीचा पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पहिला डोस दिल्यानंतर त्यांना दुसरा डोस कधी देय आहे, याविषयी माहिती द्यावी. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती द्यावी. लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शहरी व ग्रामीण भागातील ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेविषयी तालुकानिहाय माहिती दिली. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना केल्या.