
महावितरणच्या अभीयंत्यास मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
वर्धा (प्रतिनिधी) दि 27 जुलै
वीज देयकाच्या थकबाकीची वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या शाखा अभीयंत्यावर बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणाऱ्या हनुमान नगरातील तीवारी कुटुंबीतील पाच सदस्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. यामुळे तीवारी कुटुंबातील सदस्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दिनांक २३जुलै रोजी वर्धा येथील महावितरणचे शाखा अभीयंता सचिन ऊईके हे आपल्या सहकाऱ्यांसह हनुमान नगर परिसरात थकबाकीदार विज ग्राहकांकडून वीज देयकाची वसुली करीत होते.
वीज ग्राहक तिवारी यांच्या घरात ३ जोडण्या आहेत.याच देयकाची वसुली करण्यासाठी शाखा अभीयंता सचिन ऊईके आपल्या सहकाऱ्यांसह गेले असता तीवारी कुटुंबातील सदस्यांनी थकबाकीची रक्कम न भरता महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेची महावितरणकडून गंभीरपणे दखल घेण्यात आली व वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महावितरणने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिस उपनिरीक्षक ज्योती देवकुळे यांनी आरोपी नंदलाल तीवारी, पंकज तीवारी, मनमोहन तीवारी, बबन तीवारी,रघुनंदन तीवारी यांच्या विरोधात भादवि कलम १४३,२४७,१४८,१४९,३५३,३२४,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता या गुन्हया प्रकरणी तपास बाकी आहे.अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राहय धरत आरोपी नंदलाल तीवारी, पंकज तीवारी, मनमोहन तीवारी, बबन तीवारी,रघुनंदन तीवारी यांना पोलीस कोठडी सुनावली. आज आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता सरकारी वकील विजय डोरले आणि महावितरण कडून नियुक्त वकील राहुल ऊन्हाळे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध दर्शविला. महावितरणचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून आरोपी तीवारी यांचा जामीन अर्ज फेटाळला. परिणामी नंदलाल तीवारी, पंकज तीवारी, मनमोहन तीवारी, बबन तीवारी,रघुनंदन तीवारी यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस ३ वर्ष कारावासाची शिक्षा झाल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत.