नागपूर

वाहतूक व्यवस्थेचा अंमलबजावणीयोग्य आराखडा तयार करा:राधाकृष्णन बी यांचे निर्देश

नागपूर, ता. २६ : वाहतूक सिग्नल, पार्किंगची व्यवस्था, विकास कामांमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून करण्यात येणारी व्यवस्था यासंदर्भात मनपा, पोलिस वाहतूक विभाग आणि संबंधित विभागाने समन्वयातून आराखडा तयार करावा. तो अंमलबजावणीयोग्य असावा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व पार्किंग प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर परिणामकारक व दीर्घकालीन उपाय योजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची बैठक पार पडली होती. नागपूर शहरात विविध शासकीय यंत्रणांकडून वाहतुकीशी संबंधित सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे शहर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन सोमवारी (ता. २६) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात करण्यात आले होते.

बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मनपा लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, वाहतूक उपअभियंता श्रीकांत देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, नागपूर मेट्रोचे महेश गुप्ता यांच्यासह पोलिस वाहतूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्थेची माहिती घेतली. रस्त्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या वाहनांवर काय कारवाई करण्यात येते, त्यासाठी पोलिसांकडे काय व्यवस्था आहे, वाहतूक सिग्नल अनेकदा बंद का होतात, टोईंग वाहनांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत सविस्तर आढावा घेतला.

नागपूर शहरातील रस्त्यांवर अथवा शहर वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात अन्य ठिकाणी ज्या ज्या राज्य अथवा केंद्रीय शासकीय यंत्रणांमार्फत कामे सुरू आहेत ती कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणांनी जातीने लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग होत असते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर मोटर व्हेईकल ऍक्टनुसार कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र पोलिस विभागाकडे आधुनिक टोईंग व्हॅन उपलब्ध नसल्याने कारवाई करणे कठीण जाते. यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला असून बीडरची निवड करण्यात आली आहे. बीडर, वाहतूक पोलिस विभाग आणि मनपा असा त्रिपक्षीय करारनामा करण्यात येत असून करारनाम्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. पोलिस उपायुक्त आणि मनपा अतिरिक्त आयुक्त यांनी लवकरात लवकर कारारनाम्याला अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

सिग्नलवर वाहतूक पोलिसांतर्फे दोन कर्मचारी नियुक्त केलेले असतात तर मनपा कंत्राटदारांच्या माध्यमातून झोननिहाय सिग्नलची दुरुस्ती करीत असते. यापुढे आधुनिक पद्धतीने सिग्नलवर नियंत्रण ठेवून उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली. यासाठी पोलिस आयुक्तांकडे बैठक लावण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली. ट्राफिक सिग्नल सिंक्रोनायझेशनबाबतही आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला.

शहरात सुरू असलेल्या विविध विभागाच्या रस्त्यांतर्गत कामाची माहिती लोककर्म विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी घ्यावी व पुढील बैठकीत सादर करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. वाहतूक व्यवस्था आराखडा तातडीने तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!