
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी
वाशिम, दि. २६ : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२०-२१ ही १६ मे २०२१ रोजी होणार होती. आता ही परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी जिल्हयातून ६१८७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहे. ही परीक्षा जिल्हयात २६ केंद्रावर घेतली जाणार आहे. परिक्षेसाठी पात्र परीक्षार्थीचे प्रवेशपत्र २३ जुलै २०२१ पासून https://cbseitms.nic.in/index.aspx या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील.
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड (जन्मतारीख) आवश्यक आहे. तरी संबंधित विद्यार्थी किंवा पालकांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षेसाठी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या केंद्रावर ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजतापूर्वी पोहोचावे. सोबत मास्क व सॅनिटायझर इत्यादी आवश्य ठेवावे व कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.
परीक्षेसाठी येतांना प्रवेशपत्र, काळा/निळा बॉल पॉईंट पेन असणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रात दिलेल्या सर्व सुचनांचे व्यवस्थित पालन करावे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग व जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम यांचे विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. परिक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत (०७२५२-२३३००२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.