
विभागीय आयुक्तांनी सेवाग्राम येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची केली पाहणी
नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार तिसऱ्या लाटेसाठी तयारी करा-विभागीय आयुक्त
ऑक्सिजन स्वयंपूर्णतेबाबत घेतला आढावा
बापू कुटीला भेट
वर्धा दि 24 जुलै :- पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तिनपटीने प्रभावी होती. या काळात आरोग्य सुविधांचे नियोजन व प्राणवायूचा पुरवठा हे सर्व हाताळण्यात प्रशासनाला मिळालेल्या यशाबाबत कौतुक करून दुसऱ्या लाटेत जाणवलेल्या उणिवा दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाच्या नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार तयारी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी दिल्यात. विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्या प्रथमच वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असत्या त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.
दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या, त्याप्रमाणात खाटांची उपलब्धता आणि प्राणवायूसाठीची स्वयंपूर्णता याबाबी लक्षात घेऊन दुसऱ्या लाटेत लागलेल्या आरोग्य सुविधांपेक्षा 25 टक्के जास्त आरोग्य सुविधांची निर्मिती करावी . त्याचबरोबर बालकांसाठी वेगळा कक्ष, आय सी यु सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.
जिल्ह्यात प्राणवायू स्वयंपूर्णतेसाठी प्रत्येक कोविड समर्पित रुग्णालयाचे प्राणवायू निर्मिती प्रकल्पासोबतच उपजिल्हा रुग्णालय आर्वी, हिंगणघाट आणि कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयातही प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच बालकांसाठी 170 बेडची व्यवस्था सावंगी मेघे रुग्णालयात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा महिला रुग्णालय पूर्ण करण्याचे नियोजन असून त्याठिकाणी केवळ महिला व मुलांसाठीच अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
या सर्व सुविधांची विभागीय आयुक्तांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते.
सेवाग्राम येथील प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची पाहणी
दुसऱ्या लाटेत प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी झालेला त्रास बघत तिसऱ्या लाटेसाठी प्राणवायू स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येक कोविड समर्पित रुग्णालय व समर्पित कोविड आरोग्य केंद्रात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी पाहणी केली. याप्रमाणेच इतर प्रकल्पही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
जिल्हा महिला रुग्णालयाची केली पाहणी
जिल्ह्यात महिला रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले होते. मात्र कोविड काळात गे रुग्णालय महिला आणि मुलांसाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी पालकमंत्री यांनी यासाठी पाठपुरावा करून याचा उर्वरित निधी मिळवला. या रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण करून याठिकाणी बालकांसाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
महसूल विभागाचा घेतला आढावा
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाचाही आढावा घेतला. कोविड काळात महसूल विभागाने चांगले काम केले असून आता कोविड रुग्ण कमी झाले असताना महसूल विभागाने आपले मुख्य कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. ई- फेरफार वेळेत व्हायला पाहिजेत. मंडळ अधिकारी यांनी हरकती निकालात काढाव्यात. यासाठी तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी पाठपुरावा करावा. रेती घाटाचे लिलाव यावर्षी वेळेत होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी पूर्वतयारी करून ठेवण्यासोबतच शासनाचा महसूल बुडणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी दिल्यात.
बापू कुटीला भेट
दौऱ्याची सुरुवात त्यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देऊन केली. यावेळो त्यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणी केली आणि येथील शांत आणि सादगीपूर्ण वातावरणाचे कौतुक केले. बापू कुटीला भेट देणे हा अविस्मरणीय क्षण असून महात्मा गांधींची शिकवण या आश्रमात साकार होताना दिसते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.