
वाशिम: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी ७२ तासांमध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना देण्याचे आवाहन
वाशिम, दि. २२ (दिपक भारुका) : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ करिता वाशिम जिल्ह्यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी जुलै २०२१ महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान झाल्यापासून ७२ तासांमध्ये कळविणे अनिवार्य आहे.
जूलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत ‘क्रॉप इंश्युरंन्स ॲप’ (Crop Insurance App) किंवा विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका, जिल्हा कार्यालयात किंवा कृषि अथवा महसूल विभागास देणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या रिलायंस इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८०० १०२ ४०८८ असा आहे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.