नागपूर

नागपूर: रामनगर मनपा शाळेत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेशाचा शुभारंभ  

नागपूर, ता. २२ : नागपूर महानगरपालिके तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी शाळा सुरु करण्यात येत आहे. पश्चिम नागपूरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते गुरुवार (२२ जुलै) ला शुभारंभ झाला. यावेळी शिक्षण सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका रुतिका मसराम व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर उपस्थित होते. मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशन संस्थाच्या सहकार्याने झोपडपटटी भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षात सुरु होत आहे.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. काही प्रशासकीय अडचणींमुळे गतवर्षी तो मंजुर होउ शकला नाही. यावर्षी यामधील सर्व बारकावे लक्षात घेउन येणारे अडथळे दूर करण्यात आले व सभागृहाद्वारे पारीत ठरावाला आयुक्तांमार्फत मंजुरी देण्यात आली.

नागपूर शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, पुढे त्यातून ते आपल्या स्वप्नांना बळ देउ शकतील, या उद्देशाने या इंग्रजी शाळांची संकल्पना ठेवण्यात आली होती. त्यानुसार शहरातील झोपडपट्टी भागातील मनपाच्या बंद शाळा शोधून त्यामध्ये आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. मनपाच्या या पुढाकारामुळे शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. त्यांनी सांगितले की हिंदी, मराठी शाळांसाठी शासनातर्फे अनुदान प्राप्त होते परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी अनुदान प्राप्त होत नाही. मनपा तर्फे ही व्यवस्था केली जात आहे. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्ययावत करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थानी पुढे यावे, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

या सहाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेशाची सुरुवात माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त होत असल्याचे शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी सांगितले. या शाळेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल. शाळेच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आलेली आहे. या संस्थेद्वारे पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई या चार महानगरपालिकांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संचालन केले जात आहे. या संस्थेच्या कार्याची चारही मनपातील शाळांना भेट देउन नागपूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली. या संस्थेद्वारे शालेय प्रशासन व व्यवस्थापन, शाळांमध्ये नियुक्त करावयाचे शिक्षक, शाळेचा दर्जा आदी बाबींची पूर्तता केली जाईल. मनपातर्फे इमारत, दुरूस्ती, विद्युत व्यवस्था, पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना नि:शुल्क बस पास याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी माहिती यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली.

मनपा तर्फे नविन उपक्रम सुरु होत आहे याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा यांनी व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ते मध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अयुरा रोहित गंपावार आणि अबीर नरेश खैरे यांनी केजी वन (KG-1) मध्ये प्रवेश घेतला. आभार शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी मानले.

शुक्रवारी मध्य नागपूर येथे प्रवेश प्रक्रीयेचा शुभारंभ 

मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रीयेला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुक्रवारी २३ जुलै ला सकाळी ११ वाजता शुभारंभ होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!