
मनसेचा निर्धार, “३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी होणार”!
गेल्या दीड वर्षापासून देशभरात करोना संक्रमणाचा थैमान सुरू आहे त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या सण-उत्सवांवर दिसून येत आहे. गेल्या वर्षी तर सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे सगळ्यांची निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. ‘विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणारच!!! असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं असून त्याखाली मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांची नावं आहेत.
महाराष्ट्रात मराठी सण आणि दहीहंडी साजरी करणारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील मुलं ही आनंदात जगली पाहिजेत, आणि आनंदात सण साजरा झालाच पाहिजे, आम्ही 31 ऑगस्टला ठाण्यात विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्याचं जाहीर करतो’ असं अभिजीत पानसे यांनी घोषित केलं आहे. यासाठी मनसेने गोविंदा पथकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.