पूर्व विदर्भ

बाजारात प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी , बंदीचे उल्लंघन झाल्यास 5 हजार दंड

वर्धा दिनांक 1 जून  (प्रतिनिधी)

प्लास्टिकचे उत्पादने आढळल्या संबंधितांवर होणार कार्यवाही

 प्लास्टिक बंदी कृती दलाची बैठक

एकल प्लास्टिक उत्पादने जसे प्लास्टिक ग्लास, चमचे, वाट्या, सिगारेटच्या पॉकीटवरचे प्लास्टिक आवरण, मिठाईच्या डब्यावरचे आवरण, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लास्टिक स्ट्रा या वस्तु उत्पादन, वापर व साठवणुकीकरीता बंदी आहे. असे असले तरी बरेचदा अशा प्लास्टिकचा वापर होतांना दिसतो. असा वापर होत असल्याचे दिसल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही केली जाणार आहे.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या जिल्ह्याकरिता कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्लास्टिक वापरावर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, प्रादेशिक अधिकारी अशोक करे, सर्व मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने एकल वापर प्लास्टिकची उत्पादने वापरण्यास बंदी संबंधी अधिसूचना जाहिर केली आहे. त्यानुसार दि. 1 जुलै 2022 पासुन प्लास्टिक ग्लास, चमचे, वाट्या, सिगारेटच्या पॉकीटवरचे प्लास्टिक आवरण, मिठाईच्या डब्यावरचे आवरण, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीक कांड्या, प्लास्टिक स्ट्रा या वस्तु उत्पादन, वापर व साठवणुकीस बंदी आहे. त्यामुळे अशा प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जातील.

प्लास्टिकचे निर्मूलन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रात व मोठ्या गावांमध्ये प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरी भागात प्लास्टिक असेल तर ते एकत्र करून नगर पालिकेच्या कचरा गाडीमध्ये टाकावे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले.

कापडी व कागदी पिशव्यांचा वापर पर्याय म्हणून करावा. नागरिकांनी सुध्दा साहित्य, वस्तू खरेदी करतांना दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह धरू नये, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.

कृती आराखडा तयार करा

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम 2021 च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचा एक व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्लास्टिक उत्पादने, वस्तूंचे टप्प्याटप्प्याने निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न आणि संसाधने एकत्रित करून निर्मूलनाबाबतचा उपक्रम राबविण्याकरीता कालमर्यादा निश्चित करण्यात येईल.

प्लास्टिकचे संकलन, पुनर्वापर आणि विल्हेवाट यासंदर्भात निर्माण झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचे मुल्यांकन करणे आणि प्लास्टिक व्यवस्थापन धोरण त्याची अंमलबजावणी व पायाभूत सुविधा इत्यादी मधील कमतरता ओळखणे, बंदी घालण्यात आलेली प्लास्टिक उत्पादने रोखण्यासाठी वस्तूंच्या पर्यायी उत्पादनांबाबत कृती आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.

प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई

प्लास्टिक पिशव्या उत्पादने वापरणाऱ्या व उत्पादित करणाऱ्या संस्थांना दंड आकारण्यात येणार आहे. प्रथम दंड 5 हजार, दुसऱ्यांदा 10 हजार तर तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार दंड आकारला जाईल किंवा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!