
आजारी वृद्ध व्यक्तींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागपूर मनपाची विशेष मोहीम
नागपूर, ता. २० : वृद्धापकाळामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या किंवा आजारी असल्याने घरी उपचार सुरू असलेल्या नागरिकांसाठी मनपा आता विशेष मोहीम राबविणार आहे. अशा व्यक्तींना घरी जाऊन त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.
ही मोहीम केवळ घरी खाटेवर उपचार घेणाऱ्या व्यक्तींसाठी अथवा विशेष व्यक्तींसाठी राबविण्यात येणार आहे. यापूर्वी मनपाने यशवंत स्टेडियम येथे विशेष व्यक्तींसाठी लसीकरणासाठी केंद्र सुरू केले आहे तसेच ग्लोकल मॉल येथे ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’च्या माध्यमातून विशेष व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आता वृद्ध आणि कुठल्यातरी आजाराने ग्रस्त असलेल्या आणि घरी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. यासाठी https://forms.gle/NzYDUWcwQJmqsDPT8 ही लिंक शेअर करण्यात आली असून त्या लिंकवर जाऊन ज्या व्यक्तीचे लसीकरण करायचे आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरायची आहे. आवश्यक ते कागदपत्र सोबत अपलोड करायचे आहेत.
माहितीची आणि कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर मनपाची या मोहिमेसाठी असलेली समर्पित टीम संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचे लसीकरण करेल. लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीचा नातेवाईक पुढील ३० मिनिटे त्याच्यावर लक्ष ठेवेल. आवश्यकता भासल्यास पुन्हा संबंधित मोबाईल टीमला दूरध्वनीद्वारे तब्येतीची माहिती देईल.