पूर्व विदर्भ

कोविड नियमांचे पालन करुन ईद साध्या पध्दतीने साजरी करा  – जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा, दि.20:- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास शासनाने मनाई केली आहे. कोविडची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अद्याप टळला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती तिसऱ्या लाटेची आशंका व्यक्त करित आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ‘ईद’ हा सण कोविड नियमांचे पालन करत साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

बकरी ईद बाबत जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. 21 जुलै रोजी बकरी ईद असून त्या प्रसंगी जनावरांची कत्तल, कुर्बानी, जनावरांची वाहतूक इत्यादी बाबी लक्षात घेता 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. सदर सुधारित नियमांप्रमाणे गायींची, वळूची व बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे, असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी, पोलीस निरीक्षक सुनिल तेलुरे, लोकेश कणसे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थीतीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. यावर्षी 21 जुलै रोजी बकरी ईद (चंद्र दर्शनावर अवलंबून) असून ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे.

कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थीतीमुळे राज्यात सर्व धर्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जित अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यन्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. 4 जून 2021 रोजी लागू करण्यात आलेले लेव्हल ऑफ रेस्ट्रीक्शन फॉर ब्रेकींग द चेन आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!