
दिल्लीतआज नाना पटोले-राहुल गांधींची भेट; लवकरच मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता
महाराष्ट्र: आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मंत्रिमंडळात काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असून नाना पटोले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे
नाना पटोले लवकरच मंत्रिमंडळात!
दोन मंत्र्यांचे राजीनामे झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एका मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या मर्जीतले नेते आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांच्या मर्जीनुसार नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे यापुढे नाना पटोले यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
आज नाना पटोले दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षपदाबाबत देखील चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या सावटामुळे पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेता आली नव्हती. मात्र आता लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यात यावा यासाठी राहुल गांधी यांच्याकडे नाना पटोले गळ घालणार आहेत.
काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.